पुस्तकाचं नाव: बलुतं
लेखक: दया पवार
प्रकाशन: ग्रंथाली प्रकाशन
बलुतं
बलुतं...कसलं? धान्याचं.. कदाचित समाज व्यवस्थेचं आणि जाती व्यवस्थेचं सुद्धा...
हि कसली व्यवस्था जिथं मानसाला कामावरून नाही तर आडनावावरून judge केलं जातं.
बलुतं तसं तर एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहिलं जाऊ शकतं पण आपल्या आजूबाजूला काय दिसतं. स्वातंत्र्यास ७० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी जातीव्यवस्था नष्ट होण्याचा संभव दिसत नाही. कारण काय असावं?
हि कथा हि आहे दगडू मारुती पवार यांची. भुतकाळातला दगडु भविष्यकाळात दया होतो. दगडु नं दया ला सांगितलेली कथा..बलुतं...
कायद्याचा धाक असेल किंवा समाजाचे वैचारिक परिवर्तन झालेले असेल..कारण काहिहि असो..पण आता बराच फरक पडतो आहे.
बलुतं मध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचं प्रतिबिंब दिसतं. जिथं जातीनुसार कामाची वाटणी आहे. आडनावावरून जात ठरवली जाते. जातीवरून मंदिर प्रवेश नाकारला जातो. सार्वजनिक विहिरीवर पाणी भेटत नाही. वारिक यांच्या डोक्याला हात लावत नाही. या आणि अशा अनेक गोष्टी.
हे सगळं वाचताना मन विषन्न होतं. राग येतो.
यातील एका प्रसंगात लेखक लिहितात.
"शहरात केस जरी सर्रास कापले जायचे, तरी गावी मात्र गावचा न्हावी बराच काळ महार-चांभारांचे केस कापायचा नाही. वाटायचं खुषाल म्हशी भादरतो, पन म्हशीपेक्षाहि आमची किंमत जादा नसावी ना? आपलं गावचं गिऱ्हाईक तुटेल ह्या भितीनंच आमच्या वस्तीतील कुणाला तो स्पर्श करित नसावा."
हा उतारा वाचल्यानंतर त्यातील गंभिरता लक्षात येते. म्हणजे जिथं म्हशी मानसापेक्षा उच्च दर्जाच्या समजल्या जातात तिथं न्यायाची आणि समानतेची मागणी कुठुन करायची.
दुसऱ्या एका प्रसंगात लेखक लिहितात कि महार व इतर जातींतील व्यक्तींसाठि वेगवेगळ्या विहिरी असायच्या. इतर जातींतील व्यक्तींसाठिच्या विहिरीवर महारांना पाणी भेटत नसायचं. अगदिच निकड असेल तर भांडे घेऊन विहिरीवर जायचं. कोणाला दया आली तर ती व्यक्ती महाराच्या भांड्यात पाणी टाकायची. अशी एखादी पन व्यक्ती नाही भेटली तर तासनतास विहिरीवर बसुन राहावं लागायचं.
कामाच्या बाबतीत पन तसंच. अगदिच निकृष्ट दर्जाचे काम तथाकथित खालच्या जातीतील लोकांना भेटायचं.
उच्च-निच हा प्रकार तर इतका भयानक कि पोटजातीतहि भेदाभेद चालायचां. हे सगळं वाचताना मन विषन्न होतं.
आणखी एक प्रसंग असा कि, जागा महारांची, कष्ट करणारे पन महारच, मंदिर उभं करताना पन महारच कामाला..पन जेव्हा मंदिर बांधले जाते तेव्हा त्याच महार लोकांना प्रवेश नाकारला जातो. कारण काय? *जात*
म्हणजे हि तर सरळसरळ विषमता. पन दुर्दव असं कि त्यांना गुलामीची जाणीव नव्हती.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे,
" गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते पेटुन उठतील."
मग ती जाणीव शिक्षणाने सुद्धा येते. पण शिक्षणाचा अभाव असल्याने जे जसे आहे तसे स्विकारण्यातच धन्यता मानली जायची.
या आणि अशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकात भेटतील. भाषा गावाकडची आहे. फार रंगवून सांगतल्या सारखं वाटत नाही. जे जसे आहे तसे लिहिलंय असं वाटतं. काही ठिकाणी वैचारिक मंथन पन दिसुन येतं.दगडु च्या मनात चाललेलं वादळ दिसतं. दगडु च्या आई चा संघर्ष दिसतो. राजकारणात उतरलेली पिढी दिसते. व्यसनाधीनता दिसते. जिथं न्यायाची अपेक्षा करावी अशा व्यक्तिकडुन झालेला विश्वासघात हि दिसतो. एकंदर समाजव्यवस्था ढवळून निघालेली दिसते.
तसं पुस्तकात बरंच काही चांगलं-वाईट आहे पण एक गोष्ट मात्र मला खटकली. ती गोष्ट अशी कि पुस्तकात एकसंधपणा दिसत नाही. असं वाटतं की लेखकास जसं जसं आठवलं तसं तसं लिहिलंय. पन एक मात्र नक्की पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाचं दडलेले दुःख बाहेर पडतय असं वाटतं.
सगळ्यात प्रकर्षानं एक वाक्य आहे जे नं विसरण्यासारखं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते लिहितात,
" या पुस्तकातील काही भाग जर काल्पनिक वाटला तर तो केवळ योगायोग समजावा".
कदाचित अशा सुरूवातीची कोणी अपेक्षा केली नसणार.
असो. हा माझा अभिप्राय झाला. आपणास हे पुस्तक कसं वाटलं. नक्की कळवा.
आपला,
Guru Bargaje
www.gurusreads.blogspot.com