Showing posts with label माय मराठी. Show all posts
Showing posts with label माय मराठी. Show all posts

Friday, 6 November 2020

BOOK 13: शक्ती, युक्ती व बुध्दी द्वारे समस्यांना विकासाची शिडी बनवण्याचा मंत्र - प्रतिसाद

पुस्तकाचे नाव: शक्ती, युक्ती व बुध्दी द्वारे समस्यांना विकासाची शिडी बनवण्याचा मंत्र - प्रतिसाद
लेखक: मनोज अंबिके
प्रकाशन: mymirror publishing house
 
साधारणतः रात्री ०१ वाजता हे पुस्तकं हाती घेतलं. झोप येत नव्हती. विचार केला की एखादं पुस्तक वाचायला घेऊ तर आपोआप झोप लागेल. पहिले ५-१० पाने वाचली आणि उत्कटता वाडत गेली. पुढे काय होणार हे वाचण्याच्या नादात वेळ कशी निघून गेली कळलं पण नाही. सलग बसून एका बैठकीत वाचून  काडलं. सरासरी ८ तास लागले असतील. पण पुस्तकाची किमया अशी की सोडावं वाटलं नाही.
गोष्ट आहे. आदित्य ची. आदित्य, एक मुलगा ज्याचं पूर्ण बालपण हॉस्टेल मध्ये गेलं. आई वडील नाही. कुठून आला काही पत्ता नाही. त्याचा MBA होतं. त्याला वाटत की एखाद्या corporate company मध्ये काम करावं. पण कदाचित त्याची वाट वेगळी होती. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण येत. ज्या संस्थे मार्फत त्याच शिक्षण होत होत त्या शाळेतून त्याला बोलवण येतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात सगळं काही अनपेक्षित अस घडत जातं. ज्या संस्थेमुळे त्याचं पूर्ण शिक्षण झालेलं असतं त्याच संस्थे चा पूर्ण कारभार याच्या खांद्यावर येऊन पडतो. त्याच्या साठी आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट शॉक असते. त्याला काय करावं सुचत नाही. सगळं काही नवीन असतं. येणारा प्रत्येक दिवस एक नवीन समस्या घेऊन येत असतो. पण अश्या स्थितीत सुद्धा तो परिस्थिती हाताळतो. 
या प्रवासामध्ये त्याच्या समोर जे अडथळे येतात तो कसा मात करतो हे वाचण्यासारखं आहे. त्याच्या मनाची घालमेल. त्याला झालेलं विरोध. संस्थे मधील विरोधी जाणारे लोक, पाठिंबा देणारे लोक, मानसिक आधार देणारे गुरुजी या सगळ्याचं वर्णन असं आहे की डोळ्या समोर चित्र उभारल्या सारखं वाटत. 
गुरुजी आणि आदित्य मधल संभाषण वाचताना मन आध्यात्मिक व्हायला होत. कुठतरी आपल्यात पण सकारात्मक ऊर्जा आल्यासारखं वाटायला लागतं.
तो ह्या सगळ्या गोष्टीना कसा तोंड देतो हे पाहण्या सारखं आहे. आयुष्या मध्ये येणाऱ्या समस्यांना श्री प्रभू रामचद्रांचे दास हनुमानाचे गुण कसे लागू पडतात हे वाचनीय आहे. 
मला वाटतं ज्यांना फक्त प्रॉब्लेम दिसत राहतात त्यांना हे पुस्तक आधी वाचायला पाहिजे. कदाचित याने आपला प्रॉब्लेम कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. तशी सुरेख मांडणी आहे 
पुस्तकाची.
पुस्तकातील काही संवाद तर मनाला स्पर्श करून जातात. एके ठिकाणी गुरुजी म्हणतात,
" ज्याने संकट दिलं, समस्या दिली तोच समाधान पण देत असतो. फक्त जिथं संकट आहेत, समस्या आहेत तिथं जाऊन थांब. ज्या वेळेस तुम्ही समस्येपासून लांब पळता, उत्तर पण तुमच्या कडून लांब जात. संकटाच्या, समस्येच्या डोक्यावर जाऊन बस. जेव्हा तू संकटाच्या, समस्येच्या डोक्यावर जाऊन बसतोस , तेव्हा तुला तिथच उत्तर सापडतं. या जगात अस कुठलाही संकट नाही, समस्या नाही की ज्यात समाधान नाही. फक्त आपण संकटापासून लांब पाळायचा प्रयत्न करतो. म्हणूनच समाधान समोर असून सुध्धा आपल्याला दिसत नाही."
अजुन एक ठिकाणी ते म्हणतात,
" प्रत्येक घटनेमागे काहीतरी उद्दिष्ट असतं. उद्देश असतो. आपल्याला खूप वेळेला तो उद्देश कळत नाही. आपल्याला ती समस्या वाटते. आपल्याला ते संकट वाटतं. समस्यांचा, संकटांचा अर्थ सुरुवातीला कळत नाही. पण जसं- जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला समजतं की त्या अडचणी नव्हत्याच. या आपल्या मदातीकरिता आल्या होत्या. हा दृष्टिकोन नसल्या मुळे गफलत होते."

मानवी मनाच्या काही कडा व्यक्त करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत अस वाटत. मानवी स्वभाव छटा दाखवल्या आहेत. हनुमानाचे प्रतीक वापरून समस्या च उत्तर पण सांगितलं आहे.
मला तर हे पुस्तक फार आवडलं आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुधा हे पुस्तकं नक्कीच आवडेल. तुम्ही वाचल्या नंतर नक्की प्रतिक्रिया द्या. तुमच्या प्रतिसादाची आतुरता राहील. धन्यवाद.
आपला, 
गुरु बारगजे
www.gurusreads.blogspot.com

Sunday, 29 March 2020

book 12: गोफ जन्मांतरीचे : अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे

पुस्तकाचे नाव: गोफ जन्मांतरीचे:अस्तित्वाच्या प्रश्नांना  विज्ञानाची उत्तरे 
लेखिका: डॉ सुलभा ब्रम्हनाळकर
प्रकाशन: राजहंस प्रकाशन

ज्या व्यक्तीस प्रश्न पडत नाहीत, ज्या व्यक्ती निसर्गातल्या घटना पाहून अचंबित होत नाहीत, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात चिकित्सा, कुतूहल, जिज्ञासा इ. दिसून येत नाही. ती व्यक्ती आयुष्यात फार पुढे जाऊ शकत नाही. जी व्यक्ती एखाद्या प्रश्नाच्या मागे लागते, त्याच व्यक्तीला त्या विषयाच सखोल ज्ञान मिळतं आणि प्रगती होते. जर कुतूहलच नसेल तर आपल्यात आणि इतर प्राणीमात्रांत फरक तो काय?
आता साधं उदाहरण घ्या; आपण जन्माला आलो म्हणजे नक्की काय घडलं? फुलं का उमलतात? झाड व प्राण्यांमधे एवढी विविधता कशी आहे? त्यांच्यात अन् आपल्यात एवढा फरक कसा? आपण म्हातारे का होतो? आपण का मरतो? असे असंख्य  प्रश्न आपल्या मनात असतात. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत असतात. आणि ज्याची उत्तरे आपल्याला ठाऊक  नसतात त्याची उत्तरे आपण एका अज्ञात गोष्टीवर ढकलतो आणि त्यालाच समाज आणि जग 'देव' म्हणतो. अमुक ही गोष्ट कोणी केली तर देवानं केली असं एक ठळक उत्तर ठरलेलंच असतं. पण प्रत्येक गोष्ट ही देव आणि दैवावर ढकलून कसं चालेल? नाही ना, मग काय करायचं? प्रश्नांच्या मागे लागायचं , विज्ञानाच्या मार्गानं. जसेजसे आपण प्रश्न सोडऊ लागतो तसेतसे आपण निसर्गाच्या समोर नतमस्तक होतो. पण हा जाणून घेण्याचा प्रवास खूप मनोरंजक आहे बरं का. आणि हो, आपलं जगणं जे आरामदायी अन् सुसह्य जे झालंय ते याच जिज्ञासेमुळे.....
असो..आता आपण पुस्तकाकडे वळूया.
तसं वैज्ञानिक संकल्पना मराठीमध्ये व तेही सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मांडणं सोप्पं नाही. पण ते लेखिकेने अतिशय समर्पक पद्धतीने केले आहे. पुस्तकाची मांडणी तीन भागात केली आहे.
1. जीवसृष्टीचे रहस्य 
2. उत्क्रांती
3. मानवी जग
जीवसृष्टीचे रहस्य काहीसे उलगडलेले, काहीसे तसेचं.पण एक मात्र नक्की, विज्ञानाच्या वाटेवर हे रहस्य एक दिवस उलगडेल. 'जीवसृष्टीचे रहस्य' यामधे काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती भेटते. जसं की डीएनए, जीनोम, उत्पत्ती-वाढ-लय , पंचभुतांचे शरिरात रूपांतर, पेशीविभाजन,आपण का मरतो ? इ. 
दुसरा भाग आहे "उत्क्रांती". उत्क्रांत म्हणजे 
 बदल. त्यामध्ये पहिला जीव उत्क्रांत कसा झाला? पहिला जीव आजच्या जीवापेक्षा काहिसा वेगळा होता. त्या मध्ये बदल होत होत आजचा जीव तयार झाला. तो कसा झाला असावा या बद्दल "रिंग स्पेसिज" च्या माध्यमातून लेखिकेने अगदी छान समजावून सांगितले आहे. त्याच्याही पुढे जाऊन आदिजीव ते माणूस हा प्रवास कसा झाला या बद्दल माहिती आहे. त्यात केंद्र नसलेली पेशी ( prokaryot) आणि केंद्र असलेली पेशी (Eukaryot) या बद्दल सांगितलं आहे. याच एकपेशीय जीवांपासुन उत्क्रांत होत होत आजची दैदीप्यमान, वैविध्यपूर्ण सजीवसृष्टी निर्माण झालीय. त्यात जीवजंतू इ. पासुन वनस्पती, प्राणी, अमिबा,स्पंज, ctenophore, निडारिन (cnidarian) , पट्टकृमी ( flatworms), मृदुकाय (mollusc), संधिपाद ( arthopoda), मुंगी, मधमाशी, पृष्टवंशीय प्राणी (chodates), मासे, उभयचर (ambhibian) ,सरिसृप( sauropsids), सस्तन प्राणी ( mammals), शिशुधानी प्राणी(  morsupials), गाभणी सस्तन प्राणी ( placetal mammals) इ.इ. येतात.
माणुस गाभणी सस्तन प्राण्यांच्या गटात मोडतो.
उत्क्रांतसाठी तीन फार महत्त्वाच्या गोष्टी असतात.
१) सहकार्य
२) सहउत्क्रांती
३) स्पर्धा
जर जगायचं असेल, जीवसृष्टीत टिकायचं असेल तर यापैकी एक मार्ग निवडावाच लागतो. याच विभागात शरीर नावाचं यंत्र कसं कसं घडत गेलं त्याबद्दल चा ऊहापोहा आहे.
तिसरा विभाग आहे आपला. अर्थात मानवी जगाचा. यामध्ये आणखी काही प्रश्न वाढवून ठेवले आहेत. जसं की, जर सगळंच निसर्गाच्या अधीन आहे तर आपण इतका मुक्त विचार कसा करू शकतोत?  जर गुणवैशिष्ट्ये DNA
वर ठरत असतील तर मुल्य, संस्कार, विचारधारा यांना इतकं महत्व का आहे? काहि गोष्टि आपल्याकडुन नकळत कशा घडतात? 
यांतील बहुतेक प्रश्र्नांचं समाधान लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं दिसुन येते. काही काही गोष्टी वाचताना मन बधिर होऊन जातं. पण तरीही हा जीवसृष्टीचा प्रवास खुप रंजक आहे. ज्यांना या प्रश्र्नांची उत्तरे  हवीत त्या व्यक्तिंनी या पुस्तकात नजर टाकायला हवी असे मला वाटते.
यातील काही गोष्टींबद्दल आपन नंतर याच ब्लाॅग वर नक्कीच बोलुयात.
धन्यवाद!!!
आपला,
गुरु बारगजे
www.gurusreads.blogspot.com

Saturday, 29 February 2020

Book 11: बलुतं

पुस्तकाचं नाव: बलुतं
लेखक: दया पवार
प्रकाशन: ग्रंथाली प्रकाशन
बलुतं

बलुतं...कसलं? धान्याचं.. कदाचित समाज व्यवस्थेचं आणि जाती व्यवस्थेचं सुद्धा...
हि कसली व्यवस्था जिथं मानसाला कामावरून नाही तर आडनावावरून judge केलं जातं.  
बलुतं तसं तर एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहिलं जाऊ शकतं पण आपल्या आजूबाजूला काय दिसतं. स्वातंत्र्यास ७० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी जातीव्यवस्था नष्ट होण्याचा संभव दिसत नाही. कारण काय असावं?
हि कथा हि आहे दगडू मारुती पवार यांची. भुतकाळातला दगडु भविष्यकाळात दया होतो. दगडु नं दया ला सांगितलेली कथा..बलुतं...
कायद्याचा धाक असेल किंवा समाजाचे वैचारिक परिवर्तन झालेले असेल..कारण काहिहि असो..पण आता बराच फरक पडतो आहे.
बलुतं मध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचं प्रतिबिंब दिसतं. जिथं जातीनुसार कामाची वाटणी आहे. आडनावावरून जात ठरवली जाते. जातीवरून मंदिर प्रवेश नाकारला जातो. सार्वजनिक विहिरीवर पाणी भेटत नाही. वारिक यांच्या डोक्याला हात लावत नाही. या आणि अशा अनेक गोष्टी.
हे सगळं वाचताना मन विषन्न होतं. राग येतो. 
यातील एका प्रसंगात लेखक लिहितात.

"शहरात केस जरी सर्रास कापले जायचे, तरी गावी मात्र गावचा न्हावी बराच काळ महार-चांभारांचे केस कापायचा नाही. वाटायचं खुषाल म्हशी भादरतो, पन म्हशीपेक्षाहि आमची किंमत जादा नसावी ना? आपलं गावचं गिऱ्हाईक तुटेल ह्या भितीनंच आमच्या वस्तीतील कुणाला तो स्पर्श करित नसावा."

हा उतारा वाचल्यानंतर त्यातील गंभिरता लक्षात येते. म्हणजे जिथं म्हशी मानसापेक्षा उच्च दर्जाच्या समजल्या जातात तिथं न्यायाची आणि समानतेची मागणी कुठुन करायची.

दुसऱ्या एका प्रसंगात लेखक लिहितात कि महार व इतर जातींतील व्यक्तींसाठि वेगवेगळ्या विहिरी असायच्या. इतर जातींतील व्यक्तींसाठिच्या विहिरीवर महारांना पाणी भेटत नसायचं. अगदिच निकड असेल तर भांडे घेऊन विहिरीवर जायचं. कोणाला दया आली तर ती व्यक्ती महाराच्या भांड्यात पाणी टाकायची. अशी एखादी पन व्यक्ती नाही भेटली तर तासनतास विहिरीवर बसुन राहावं लागायचं.

कामाच्या बाबतीत पन तसंच. अगदिच निकृष्ट दर्जाचे काम तथाकथित खालच्या जातीतील लोकांना भेटायचं.
उच्च-निच हा प्रकार तर इतका भयानक कि पोटजातीतहि भेदाभेद चालायचां. हे सगळं वाचताना मन विषन्न होतं.
आणखी एक प्रसंग असा कि, जागा महारांची, कष्ट करणारे पन महारच, मंदिर उभं करताना पन महारच कामाला..पन जेव्हा मंदिर बांधले जाते तेव्हा त्याच महार लोकांना प्रवेश नाकारला जातो. कारण काय? *जात*
म्हणजे हि तर सरळसरळ विषमता. पन दुर्दव असं कि त्यांना गुलामीची जाणीव नव्हती. 
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे,
" गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते पेटुन उठतील."
मग ती जाणीव शिक्षणाने सुद्धा येते. पण शिक्षणाचा अभाव असल्याने जे जसे आहे तसे स्विकारण्यातच धन्यता मानली जायची.

या आणि अशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकात भेटतील. भाषा गावाकडची आहे. फार रंगवून सांगतल्या सारखं वाटत नाही. जे जसे आहे तसे लिहिलंय असं वाटतं. काही ठिकाणी वैचारिक मंथन पन दिसुन येतं.दगडु च्या मनात चाललेलं वादळ दिसतं. दगडु च्या आई चा संघर्ष दिसतो. राजकारणात उतरलेली पिढी दिसते. व्यसनाधीनता दिसते. जिथं न्यायाची अपेक्षा करावी अशा व्यक्तिकडुन झालेला विश्वासघात हि दिसतो. एकंदर समाजव्यवस्था ढवळून निघालेली दिसते.
तसं पुस्तकात बरंच काही चांगलं-वाईट आहे पण एक गोष्ट मात्र मला खटकली. ती गोष्ट अशी कि पुस्तकात एकसंधपणा दिसत नाही. असं वाटतं की लेखकास जसं जसं आठवलं तसं तसं लिहिलंय. पन एक मात्र नक्की पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाचं  दडलेले दुःख बाहेर पडतय असं वाटतं.
सगळ्यात प्रकर्षानं एक वाक्य आहे जे नं विसरण्यासारखं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते लिहितात,
" या पुस्तकातील काही भाग जर काल्पनिक वाटला तर तो केवळ योगायोग समजावा".
कदाचित अशा सुरूवातीची कोणी अपेक्षा केली नसणार.
असो. हा माझा अभिप्राय झाला. आपणास हे पुस्तक कसं वाटलं. नक्की कळवा.

आपला,
 Guru Bargaje
www.gurusreads.blogspot.com

Wednesday, 1 January 2020

BOOK 10: तिमिरातून तेजाकडे-समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे (भाग १)

BOOK 10: तिमिरातून तेजाकडे-समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे
लेखक: डाॅ. नरेंद्र दाभोलकर
प्रकाषक: राजहंस प्रकाशन प्रा. लि.



माझ्या हाती पडलेलं डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचं हे दुसरे पुस्तक. त्यांच्या " विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी" या पुस्तकाबद्दल मी यापूर्वी लिहिलेलं आहे.





डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचं हे दुसरे पुस्तक प्रामुख्याने ३ भागात विभागले आहे. 
१) विचार
२) आचार
३) सिद्धांत
या पुस्तकाबद्दल मी दोन टप्प्यांत लिहिणार आहे.
डॉ नरेंद्र दाभोळकरांनी "विचार" मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष, वास्तुशास्त्र, संमोहन, भानामती, बुवाबाजी इ. विषयांवर अगदि परखड भूमिका मांडली आहे.
आपण त्याकडे थोडक्यात बघुया.
I) वैज्ञानिक दृष्टिकोन:
 कोणत्याही गोष्टीमागचा कार्यकारणभाव शोधने म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. यासाठी फार मोठ्या तांत्रिक व्याख्येची गरज नाही.वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्यासाठि विज्ञान शाखेची पदवी लागते का? तर अजिबात नाही. आसपासचे जग काही नियमानुसार चालते. ते जाणून घेण्याचे कुतुहल असेल तरी पुरेसे आहे.
 वैज्ञानिक दृष्टिकोनात भारत मागे का?
- याची काही ढोबळ कारणे अशी:

१) बाबावाक्य प्रमानम-
अर्थात बाबाजी जे बोलतील तेच खरं. मग त्याची चिकित्सा तर दुरच राहिली, त्या बद्दल शब्द सुद्धा गुन्हा ठरवला जातो.

२) ज्ञानबंदि-
कित्येक शतके भारतात जातिव्यवस्था बळकट होती व आजही काही प्रमाणात ती अपवादाने का असेना पण दिसुन येते. पुर्वी हे खुप तीव्र असायचं.या जातीव्यवस्थेमध्ये तथाकथित अस्पृश्य जातीतील लोकांना ज्ञानसंपादनाची परवानगी नसायची. स्त्रियांना तर ज्ञानबंदि होतीच होती. आणि जे काही शिक्षण असायचं ते धार्मिक शिक्षण व आकडेवारी यापलीकडे कधी गेलच नाही. जिथे ज्ञानच नाही तिथं विज्ञान कुठुन येणार. वैज्ञानिक दृष्टिकोन तर शक्यच नाही.

3) शंका निरसन न होणे
लहान मुलांच्या मनात बऱ्याच गोष्टींना घेऊन कुतुहल असते. ते खुप प्रश्न विचारतात. अशा वेळी त्यांच्या शंकांचे निरसन होणे आवश्यक असते पण बहुतेक वेळा समाधान होण्यापेक्षा त्यांना गप्प बसण्यास सांगितले जाते. तिथेच त्यांच्या चिकित्सक वृत्तीला लगाम लावला जातो. मग लहानपणापासून असे संस्कार घेऊन मोठी झालेली व्यक्ती चिकित्सक असेल काय? वैज्ञानिक दृष्टिकोनासाठि व्यक्ती चिकित्सक असने गरजेचे आहे.

४) व्यक्तिंचे दैवतिकरण
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला देवस्थानी बसवले कि आपण आपली पुर्ण विवेकबुद्धी तिथं गहाण ठेवली असं समजा. आपली श्रद्धा अशी होऊन जाते कि त्या व्यक्तीने काही हि केले किंवा सांगितले तर आपल्याला ते मान्यच असते.  काहि महाभाग तर इथपर्यंत पोहोचतात कि फक्त आमचे बाबा किती "खरे" आणि बाकीचे किती "भोंदू" आहेत. श्रद्धा असणं गैर नाही पण आपण कुणावर श्रद्धा ठेवतोय हे पाहणं पण गरजेचे आहे.

५) राजकीय अनास्था
काहि राजकीय नेत्यांना याची जाणीव असते कि आपल्या मुक-सहकार्यातून गैरप्रकार वाढु शकतात पण लोकक्षोभ नको म्हणुन कारवाई टाळली जाते.

II) फलज्योतिष शास्त्र (?)
कोणतीही बाब शास्त्र म्हणुन उतरण्यासाठी एक ग्रहितक मांडावे लागते. विज्ञानाच्या कसोटीवर ते तपासून सिद्ध झाले तर त्यास शास्त्र आहे असे संबोधले जाते.
फलज्योतिषाचा सर्व व्यवहार ज्या मांडणीवर उभा आहे ते ग्रहितक असे.-
१) आकाशस्थ ग्रहगोलांचा परिणाम मानवी जीवनावर सतत होत असतो.
२) मानसाच्या जन्मवेळेवर तो अवलंबून असतो.
३) त्यामुळे व्यक्तीचे भविष्य ठरते किंवा जे ठरलेले आहे ते कळते आणि बदलतेहि.

याच आधारावर सर्व फलज्योतिषाचा पसारा उभा आहे. आता यातील पोकळपणा पाहु.
एक तर आकाशातील कोट्यावधी ग्रहताऱ्यांपैकी काही मोजक्या ताऱ्यांना कुंडलीत स्थान आहे. बाकीच्या ग्रहताऱ्यांना काडीची किंमत नाही. 
कुंडलीत आढळणारे ग्रह म्हणजे सुर्य, चंद्र,मंगळ,बुध, गुरु,शुक्र,शनी,राहु व केतु. सुर्यमालिकेतील युरेनस, नेपच्यून व प्लुटो हे ग्रह १५० वर्षांपूर्वी कुंडलीत नव्हतेच, कारण त्यांचा शोध लागला नसल्यामुळे ज्योतिशांना ते ठाऊक नव्हते.बर तेहि जाऊ द्या. कुंडलीतील कथित नवग्रहाची स्थिती काय आहे? यांपैकी सुर्य हा तारा आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. राहु , केतु नावाचे ग्रह तर अस्तित्वात च नाहीत. चंद्र या उपग्रहाला जर कुंडलीत स्थान आहे तर इतर उपग्रहांना पण असायला हवे. पण तसेही आढळत नाही. 
व्यवस्थित विचार केला तर हा सगळा गडबड घोटाळा लक्षात येतो.

III) वास्तुशास्त्र
खरेतर या गोष्टीची चर्चा होण्याची गरज नाही पण तरीही ती चर्चा करावी लागते हेच मुळात चुकीचे वाटते. स्वतःचे घर असणं हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे.मग ते घर लाभावं अशी मनस्वी इच्छा असते. घर लाभत म्हणजे काय तर भरभराट व्हावी , बढती मिळावी, धंद्यात फायदा व्हावा इ. पण त्या मागचे कारण न शोधता वास्तु च खराब आहे असं ग्रहित धरल जातं. मग ती वास्तु शांती (?) केली जाते. खरच याला काही कार्यकारणभाव आहे का ? भरभराट होणे, बढती होणे यात तुम्ही केलेल्या कामाचे फळ असणार आहे, यात तुम्ही कोणत्या वास्तु मध्ये राहतात याला काडिची किंमत नाही.

IV) मन व मनाचे आजार
मुळात मन आजारी पडतं म्हणजे काय होतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असे लक्षात येते की एखाद्या व्यक्तीला वेड लागल्यासारखे होते, व्यक्ती असंबद्ध बडबड करते, कधी-कधी अंगात पण येते. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ती व्यक्ती प्रत्येक वेळी नाटक करत नसते, ती त्या व्यक्तीची प्रामाणिक प्रतिक्रिया असु शकते. 
एक उदाहरण घेऊ. गावाकडे काही स्त्रियांच्या बाबतीत असं आहे की त्यांच्याकडे व्यवहार नसतो, त्यांच्या मताला कोणी किंमत देत नाही, घरात दुय्यम स्थान दिलं जातं. अशा वेळी त्यांच्या मनातील भावना व विचार त्या मनमोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत. हे विचार असेच साचत जावून त्यांच्या मनावर ताण येऊन वरील प्रकार घडु शकतो. त्यातल्या त्यात ज्या व्यक्तीला कोणी विचारत नाही त्यांना अंगात देवी आल्यावर सगळे मान देतात. ज्या व्यक्तीला कोणी विचारत नसतं त्या व्यक्तीसाठी हि सुखद अनुभव असु शकतो. अशा वेळी त्या व्यक्तीस दोष देण्यापेक्षा समजून घेतलं तर ते अधिक प्रभावी होईल.

V) बुवाबाजी
बुवाबाजीचे पीक या भुमीत भरघोस येण्याचे कारण म्हणजे अति दैववाद व नशीब नावाच्या काल्पनिक गोष्टी वर अती विश्वास.
बुवाबाजीचे डॉ नरेंद्र दाभोळकरांनी २० मुख्य कारणे दिली आहेत. त्यातली काही अशी:
१) अगतिकता, अस्थिरता व अपराधीपणा
आजच्या जगात पुढच्या क्षणी काय होईल याची खात्री नाही. मला काही झालं तर काय याची काळजी नेहमी असते. येण्यऱ्या संकटातून माझे बाबा सुटका करतील अशी आशा भक्त करत असतो.
कधी-कधी केलेल्या चुकांना घेऊन एक अपराधीपणाची भावना मनात असते. बाबांना शरण गेलं म्हणजे आपले पाप धुतले जातील अशी आशा भक्तास असते.
२) अतृप्त कामना
सगळं काही मनासारखं व्हावं असं वाटणं
३) मानसिक आधार
४) आत्मा,परमात्मा,ब्रम्ह, परब्रह्म,मोक्ष, मुक्ती या शब्दांचे मायाजाल
५) अवतारवाद
६) सामाजिक प्रतिष्ठेचा लाभ इ.
७) चमत्कार
चमत्कारांना सत्य मानणे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता चमत्कारांना शरण जाणे हे मानसिक गुलामगिरी चे लक्षण आहे.

यांपैकी बुवाबाजी या प्रक्रियेतून एकुणच जी मानसिक गुलामगिरी तयार होते, तिचे गांभीर्य सर्वाधिक आहे.

या ब्लाॅग पोष्ट मध्ये इतकंच. या पुस्तकाचे "आचार व सिद्धांत" आपण पुढिल पोष्ट मध्ये पाहु.
धन्यवाद.

आपला, 
गुरु बारगजे
www.gurusreads.blogspot.com



Monday, 21 October 2019

BOOK 8: अमृतवेल

पुस्तकाचे नाव: अमृतवेल
लेखक: वि.स.खांडेकर
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रेम हे विद्युत जोडणी सारखं वाटतं कधी-कधी. म्हणजे बघा ना... व्यवस्थित जोडणी झाली तर प्रकाश.. अंधारास जाळणारा लख्ख असा प्रकाश.. पण तीच जोडणी चुकली तर..शाॅर्ट सर्किट..आग.. कधी न भरुन येणारं नुकसान सुद्धा. प्रेमाचं पन असच असतं ना. जोडणी योग्य झाली पाहिजे. नाही तर जीवन अंधकारमय व्हायला वेळ लागत नाही.
अमृतवेल वाचताना या गोष्टीची जाणीव पदोपदी होते.जर प्रेम निस्वार्थ भावनेने असेल तर ते बहरते पन त्याच प्रेमात स्वार्थ, अपेक्षा इ. आल्या कि प्रेम कंडिशनल होऊन जातं. मग छोटासा अपेक्षाभंग नात्यांची वाट लावुन टाकतो.
अमृतवेल हि अशीच एक गोष्ट आहे. यात प्रेम आहे,विरह आहे, अपेक्षा आहे आणि अपेक्षाभंग सुद्धा. यात एक आईचं मन आहे आणि तीच आई आहे जी नवऱ्याच्या दृष्टिने कुलटा आहे. नंदा नावाच्या मुली पासुन सुरू होऊन हि कथा एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबते. नंदा, जीचा होनारा नवरा अपघातात मृत्यूमुखी पडतो. ती नंदा सैरभैर होते. मन रमवण्यासाठी म्हणुन ती तिच्या मैत्रिणीकडे (वसु) कडे जाते. वसु एक गरिब घरची व सुंदर असते. तीचे गायन पण अतिशय सुरेख असते. तीच्या रुपाला व गळ्याला मोहित होऊन एक जहागिरदार (देवदत्त) तीला मागणी घालतो. हि पण त्याच्या संपत्तीला भाळून होकार देते. वरकरणी सर्व काही सुरळीत वाटत असताना त्यांच्या नात्यात मात्र कमालीचा दुरावा जानवतो. वसुंधरा व तीची मुलगी मधुरा यांना देवदत्त राक्षसी वाटतो. तर देवदत्त स्वत:च्या वडिलांच्या मृत्यूसाठी आई ला जबाबदार धरतो व त्याचा स्वभाव विचित्र होतो. देवदत्त प्रचंड संपत्ती असुनही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. तो त्याच्या मनात एकाकी आहे.
पन त्या सर्वांना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते त्यांच्या ठिकाणी बरोबर वाटतात.
पुढे वसुंधरा चं काय होतं, वसुंधरा चे व देवदत्त चे नातं सुधारतं का, नंदा या परिस्थितीत कशी वागते, देवदत्त ची आई स्वत:ला कसं स्पष्ट करते या सगळ्या गोष्टी आपल्याला पुस्तकात बांधुन ठेवतात. पुस्तकातील शब्दसामर्थ्य असं कि काही क्षण का असेना आपण स्वत:ला विसरून जातो.
आपण जे असतो ते व आपण जे जगाला दाखवतो ते या दोन्ही मध्ये खुप अंतर असु शकते. मनाच्या दोन बाजू इथं पानोपानी जानवतात.
वि.स.खांडेकरांचे शब्दसामर्थ्य व प्रेम-विरहाची कथा यासाठी या पुस्तकात एक नजर टाकायला काही हरकत नाही असं मला वाटतं.
पुस्तक वाचल्यानंतर तुम्हास हे कसे वाटले ते नक्की कळवा.
सदैव तुमचा,
गुरू बारगजे
@www.Gurusreads.blogspot.com

Wednesday, 19 June 2019

Book 5: विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी

पुस्तकाचे नाव: विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी
लेखक: डाॅ. नरेंद्र दाभोलकर
प्रकाषक: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
काही पुस्तके अशी असतात जी फक्त पानांचा संग्रह न ठरता विचारांचा उद्रेक ठरतात. त्यातल्या त्यात जेव्हा ती पुस्तके सद्य परिस्थितीशी साधर्म्य दाखवणारी असतात तेव्हा आपोआपच त्यांच मोल कैकपटीने वाढतं. हे पुस्तक म्हणजे असाच विचारांचा एक विस्फोटक खजिना आहे. यातील एक एक लेख वाचताना आपण किती पुरोगामी (?) आहोत याची जाणीव प्रकर्षाने होते.

अंधश्रद्धा म्हटले की आपल्याला फक्त बुवाबाजी आठवते. खरं तर बुवाबाजी ही अंधश्रद्धेच्या अनेक बाजुंपैकी एक बाजू झाली. अंधश्रद्धेची तशी एक ढोबळ व्याख्या करायची झाली तर ती अशी करता येईल. ज्या गोष्टीला कुठलाही कार्यकारणभाव नाही त्या गोष्टी ला अनुसरण करणे म्हणजे अंधश्रद्धा. यावर तथाकथित लोक जे स्वतःला धर्माचे पाईक व रक्षक समजतात त्यांचा विरोध होतो, कारण कार्यकरण भाव लावणारा माणूस विचार करायला लागतो. आणि जो व्यक्ती विचार करायला लागतो तो प्रश्न विचारायला लागतो. आणि प्रश्न विचारणारे अनुयायी कोणालाच नको असतात. याचं कारण अगदी साधं आहे. विचार करणारं मन कधी मानसिक गुलामीत राहत नाही.
आणि याचा परिणाम सरळसरळ हित संबंधावर होतो.
मग काय करायचं तर सर्व सामान्य माणसाला अश्या गोष्टींमध्ये अडकाऊन टाकायचं कि त्यांनी विचार च केला नाही पाहिजे. जरी एखादा माणूस देवा बद्दल किंवा धर्माबद्दल काही चिकित्सक बोलत असेल तर त्याला धर्मद्रोही ठरवलं जातं. 
आपण बऱ्याच लोकांकडून ऐकले असेल किंवा वाचलं असेल कि या या बुवाबाबा कडुन आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक त्रास झाला किंवा फसवणूक झाली तेव्हा असे का होते याचा विचार केला तर असे लक्षात येईल की त्यांच्या कडे जाणारा व्यक्ती कुठे तरी एक आधार शोधत असतो. आधाराच्या शोधात ती व्यक्ती इतकी गुरफटून जाते की आपली कोणी फसवणूक करत आहे हेच मुळी लक्षात येत नाही. अशा वेळी हे हितचिंतक (?) वेगवेगळ्या मार्गाने ,आलेल्या लोकांना असे काही संमोहित करतात कि लुटणारे बुवाबाबा च त्यांना त्यांचे मसिहा वाटायला लागतात.
मग यावर काय करायचं याचा उपचार डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अगोदरच सांगितलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याची काळजी घेते कि कोणाचीही अशा व इतर गैरमार्गाने फसवणूक होऊ नये. 
या चळवळीची एक चतु:सुस्त्री आहे. 
१) शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे;
२) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे व त्या आधारे विविध घटना तपासणे;
३) धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा करणे म्हणजे धर्माबद्दल काही आकलन व धर्मनिरपेक्षतेचा वेगळा दृष्टीकोन रुजविणे;
४) व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणे,सजग करणे.

या मुख्यतः चार उपाययोजना करुन अंधश्रद्धांना बऱ्यापैकी आळा घालणं शक्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केवळ शिक्षणाने फरक पडत नाही तर त्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण आजच्या (२१ शतक चक्क) काळात हि घर आपण बांधून घेतो पण त्याची शांती(?) केल्या शिवाय राहत नाही. अगदि तसेच अशिक्षित सोडा पण शिकलेल्या लोकांच्या अंगात येते,आम्हि वाहनाला लिंबु - मिरची लावतो, कुठल्याही शेंदुर लावलेल्या दगडाच्या पाया पडतो, आजही काही गावांमध्ये आजारी पडल्यावर जाणत्या चा सल्ला घेतला जातो. या सगळ्या गोष्टी आपल्या पुरोगामी (?) महाराष्ट्रात घडतात पाहुन आपल्या समाजाच्या मानसिक दारिद्रयाची किव येते.
अंधश्रद्धेचा अतिरेक कधी कधी निरपराध लोकांचा जीव घेतो. या सगळ्या गोष्टी पासुन जर विकास करता आला असता तर आपल्याला विज्ञानाची गरज पडली नसती.
थोडासा विचार केला तरी लक्षात येईल की हा सगळा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी केलेला प्रकार आहे.अशा लोकांपासून सावध व्हायला हवं.
अंधश्रद्धेविरुद्ध ची लढाई सोपी नाही कारण बुवाबाजी आज परमोच्च बिंदू ला पोचली आहे. तोंडी प्रचारा पासुन ते डिजिटल प्रचारा पर्यंत यांची मजल पोचली आहे. सोबत त्यांचे लाखो अनुयायी तर असतातच. हे लाखो अनुयायी आपली मतपेटि बनलेली कोनाला नाही आवडणार? मग या सर्व प्रकाराला राजकीय मुक संमती दिली जाते. आजुबाजुला थोडी नजर टाकली तर आपल्याला ते लक्षात येईल. मग काय करायचं? शांत बसायचं का? तर बिलकुल नाही. आजच्या घडीला आपण स्वत: पासुन सुरुवात करु शकतो. आपण एवढेच करायचं कि ढोंगी लोकांना ओळखुन त्यांना आपल्या व आपल्या परिवाराच्या आजूबाजूला फिरकु द्यायचं नाही.
Start it small and make it large.
कारण परिवार हा समाजाचा प्रारंभ आहे.

पण ढोंगी कोण आणि साधु कोण हे कसं ठरवायचं? मग खालील शब्द नीट वाचा.

" जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जानावा."

-धन्यवाद,
गुरू बारगजे
www.gurusreads.blogspot.com

Friday, 1 February 2019

Book 3: शेअर बाजार.. जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव !

पुस्तक: शेअर बाजार... जुगार ?  छे, बुद्धिबळाचा डाव !
लेखक : रविंद्र  देसाई
प्रकाशन : राजहंस प्रकाशन  प्रा. लि.

शेअर म्हटले  कि  आपल्याला फक्त नुकसान झालेले  उदाहरणं  आठवतात...तसे  कारण  ही  आहेच म्हणा. कारण  आपल्या  अवतीभवती जी  काही माणसे  शेअर  मार्केट  चा सल्ला देत असतात त्यांनाच एकतर  या क्षेत्राचा अनुभव  नसतो किंवा फार कमी असतो. मग कोणी तरी  बोलतो कि अमुक अमुक शेअर घ्या आणि हे महाशय शेअर घेऊन टाकतात. मग त्या मागचा कार्यकारणभाव ते लक्षात घेत नाहीत. आपण ते शेअर का घेतले याचा त्यांना काही अंदाज नसतो. जरी आपण विचारले तरी ते स्पष्ट उत्तर देऊ शकत नाहीत. फारफार  ते एवढच म्हणतील कि आम्हाला ते शेअर घ्यायला अनुभवी माणसाने सांगितले आहे किंवा ती कंपनी चांगली आहे. मग नुकसान  झाले कि नशिबाला  दोष देत  राहतात आणि  जगभर  सांगत फिरतील कि शेअर मार्केट म्हणजे  जुगार आहे पण खरंच  तसं  आहे का? एखाद्या कंपनी चा नावलौकिक चांगला आहे म्हणून फक्त्त त्या कंपनी चे शेअर आपण घेणार का? बाजारातून  आपण एकादी गोष्ट घेतो तेव्हा जितकी चौकशी  आपण करतो तेव्हडी चौकशी आपण शेअर घेताना का  करत नाही?
याचं कारण असं कि एकतर शेअर मार्केट  बद्द्ल ची अकारण असलेली  भीती आणि  दुसरं म्हणजे  त्या बद्दल असलेली माहिती मिळवायची कुठून याचं ज्ञान नसणे.
जर  भीती घालवायची असेल  तर मार्केट मध्ये उतरावांच लागेल  आणि त्या  बद्दल माहिती मिळवायची असेल तर मग  हे पुस्तक खास तुमच्या साठी आहे असं समजा.
पुस्तकाबद्दल  थोडंसं :
हे पुस्तक नवख्या गुंतवणूकदारासाठी सुरुवातीचे ज्ञान घेण्यासाठी  अगदी उत्तम आहे  असं मला वाटते. अगदी शेअर म्हणजे  काय इथपासून ते सेन्सेक्स  काय निफ्टी काय, डिलिव्हरी आणि इन्ट्राडे  चे व्यवहार कसे होतात, जेव्हा बाजार कोसळत असतो  म्हणजे  "bear" मार्केट असताना  काय  करायचं आणि  मार्केट  जेव्हा  चढत्या दरावर असते म्हणजे "bull" मार्केट असते तेव्हा काय करायचं  याचं विवेचन अगदी  छान दिलेले आहे.
समजा एखादा शेअर आपल्याला खरेदी करायचा आहे तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायच्या,कोणत्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं याबद्दल ची माहिती खूप छान दिलेली  आहे.
हे पुस्तक कोणासाठी :
हे पुस्तकं त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांना  शेअर  मार्केट बद्दल माहिती हवी आहे. शेअर मार्केट ची abcd  इथून आपल्याला  कळेल.
काही  मुद्दे जसे कि market cap,earning per share(EPS),dividend, face value, P/E ratio,book value,net sales,other income,PBDIT,net profit,operating profit,reserves,net worth, total liabilities, loans इत्यादी, या बद्दल छान  माहिती  आपल्याला  मिळेल.
फक्त्त  या संज्ञा माहित असून उपयोग नाही. याचा उपयोग  शेअर घेताना कसा करायचा हे माहित असणे गरजेचे आहे. ज्यांना हे कसे वापरायचे हे माहित नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे असं समजायला हरकत नाही.
अजून एक  महत्वाची  गोष्ट म्हणजे कोणत्याही  कंपनी ची बॅलन्स शीट  वाचता येणे  व त्यातून योग्य तो अर्थ लावता येणे. कोणत्याही  कंपनी ची बॅलन्स शीट आपल्याला  www.Moneycontrol.com या संकेतस्थळावरून मिळवता येईल. एकदा ती मिळाली कि वाचायची कशी ते हे पुस्तक आपल्याला शिकवेल.
काही इतर  गोष्टी :
या पुस्तकामध्ये शेअर  मार्केट च्या ब्रोकर बद्दल तर माहिती दिलेली आहेच पण मार्केट मध्ये इतर  ही काही ब्रोकर आहेत.या पूस्तकामधे लेखकाने sbi  च्या डिमॅट  अकाउंट  बद्दल  सांगितलेले  आहे. मार्केट मधील  इतर काही  ब्रोकरची  नावे :
1) zerodha
2) 5paisa
3) sharekhan
4) Angel  broking  etc
मार्केट  मध्ये इतर ही  ब्रोकर आहेत. ते तुम्हाला साधे  गूगल  वर  शोध करून मिळू शकतात. मी zerodha  या ब्रोकर ला निवडलेले आहे.
काही  संकेतस्थळ ज्यामधून शेअर बद्दल माहिती मिळू शकते :
1) moneycontrol.Com
2) screener.in
3) nseindia.Com
4) bseindia.Com
इत्यादी.
(कृपया नोंद घ्यावी :
ब्रोकर ची नावे व संकेतस्थळ नावे मी आपल्या माहिती करिता दिलेली आहेत. मला त्यांच्या कडून काहीही फायदा मिळत नाही.)
(Please  note: names of broker and websites given here are for your information  and totally  voluntary. I do not get any benefits  from them)
माझे  मत :
लेखकाने अगदी  विस्तृत  असे  विवेचन या पुस्तकामध्ये दिलेले आहे. आपल्या सारख्या नवीन गुंतवणूक दारांसाठी हे एक छान पुस्तक आहे.
आणि जर आपण शेअर मार्केट मध्ये उतरणार असाल तर या पुस्तकामधे एक नजर टाकायला हवी असे मला वाटते.

-आपला आभारी, 
गुरु  बारगजे 
gurusreads.blogspot.Com

New year 2021

परत एक नविन वर्ष सुरुवात होणार....अगदी दरवर्षी होत तसच . पण या वर्षात आणि ईतर नविन वर्षात खुप फरक आहे. काय काय पहायला मिळाल, कित्येक अनुभव आ...